पुणे, दि. २९ (पीसीबी) – गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर खूनप्रकरणातील ४ आरोपींना २४ तासाच्या आत अटक केली आहे. गुन्हे शाखा युनीट चारच्या पो.नि.लक्ष्मण बोराटे यांच्या पथकाने मोशी जकात नाका येथून आरोपींना जेरबंद केले.
प्रविण प्रकाश काळे (वय २३, रा. प्रोफेसर कॉलनी, शिरुर), विशाल सुनिल काळे (वय २१, ढोरआळी, मुंबई बाजार, शिरुर), सनी संजय यादव (वय १९, रा. कामाठीपुरा, शिरुर) आणि रुपेश हेमंत लुनिया (वय १९, रा. सोनारआळी, शिरुर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शिरुर येथील कामाठीपुरा येथे राहणारा आरोपींचा मित्र नानू उर्फ निलेश कूर्लप याचा ३० मे रोजी वाढदिवस होता. आरोपींना त्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घ्यायचा होता. मात्र, महेंद्र मल्लाव यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमास विरोध केला होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातून त्यांनी रविवारी मल्लाव यांचा खून केल्याची कबूली दिली. तसेच दुचाकी पेट्रोल संपल्यामुळे शिक्रापुर तळेगाव – ढमढेरे रोडवर सोडून दिल्याचे सांगितले.
शिरूरमधील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब काळे यांचे रविवारी निधन झाले होते. दुचाकीवरुन महेंद्र मल्लाव रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी निघाले होते. बाजारपेठेतून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी मल्लाव यांना अडविले. मल्लाव यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या मल्लाव यांचा जागीच मृत्यू झाला होता. यामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच पोलिसांबाबत नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता.
