स्वित्झर्लंड येथील महान गिर्यारोहक ऊली स्टेक,
पुणे ०२ मे २०१७ (पी सी पी न्यूज) : गिर्यारोहणातील झंजावाताची अखेर, ऊली स्टेक, वय ४१, या जगप्रसिद्ध गिर्यारोहकाचा दिनांक ३० एप्रिल, रविवार रोजी सकाळी ८ च्या सुमारास एव्हरेस्ट शिखर परिसरातील नूपतसे (उंची ७८६१ मीटर्स) या शिखरावर चढाई करताना दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला.
ऊली स्टेकच्या अशा अचानक जाण्यामुळे गिर्यारोहण जगतामध्ये शोककळा पसरली आहे आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी हीं कधीही न भरून येणारी आहे. आज गिर्यारोहण करणाऱ्या आणि गिर्यारोहण करण्यासाठी येणाऱ्या नव्या गिर्यारोहकांसाठी ते कायमच आदर्श राहतील. त्यांनी सांगितलेला एक विचार जो खरोखरच एक वस्तुस्थिती आहे, ” ‘काल’च्या मधून शिका, ‘आज’ जगून घ्या आणि ‘उद्या’साठी आशावादी राहा “. यावर्षीच्या २०१७ वर्षीच्या एव्हरेस्ट चढाईच्या मोसमामधील हा पहिला मृत्यू ठरला. ऊली स्टेक हे स्वित्झर्लंड या देशाचे होते. नेपाळमधल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऊली स्टेक हे त्यांची २०१७ वर्षातील महत्वाकांक्षी मोहीम म्हणजेच जगातील सर्वोच्य शिखर माऊंट एव्हरेस्ट (८८५० मीटर्स) आणि जगातील चौथे उंच शिखर माऊंट लोहत्से (८५१६ मीटर्स) या दोनही शिखरांवर नव्या मार्गाने चढाई करण्याची मोहीम पूर्ण करण्यासाठी नेपाळ मध्ये आले होते. या मोहिमेच्या तयारी साठी ते गेले २ महिने माऊंट एव्हरेस्टच्या परिसरातील वेगवेगळ्या शिखरांवर चढाई करत होते. या तयारीचा भाग म्हणून आणि वातावरणाशी समरस होण्यासाठी दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी नूपतसे या शिखरावर त्यांनी चढाईला सुरुवात केली. चढाई करताना त्यांचा पाय घसरून साधारण ३००० फूट खोल नूपतसे शिखराच्या तळाशी पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह काठमांडू मध्ये आणला गेला.
ऊली स्टेक हे जगातल्या सर्वोत्तम गिर्यारोहकांपैकी एक असे होते. गिर्यारोहणाला त्यांनी त्यांच्या कामगिरीमधून एका वेगळ्या उंचीवर नेले होते. ते त्यांच्या स्पीड क्लाइंबिंग आणि तंत्रशुद्ध क्लाइंबिंगसाठी जगप्रसिद्ध होते. गिर्यारोहणामध्ये स्पीड क्लाइंबिंगची संकल्पना त्यांनी सर्वप्रथम आणली. स्पीड क्लाइंबिंग मधले अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतर एका मागोमाग एक अशा अनेक दर्जेदार मोहिमा त्यांनी एकट्याने (solo) पूर्ण केल्या. त्यांनी केलेल्या मोहिमांमध्ये विशेष ऊल्लेख करता येतील यात माऊंट ऎगर नॉर्थ फेस (३९७० मीटर्स, स्वित्झर्लंड), मॅटरहॉर्न नॉर्थ फेस (४४७८ मीटर्स, स्वित्झर्लंड), माऊंट एवरेस्ट (८८५० मीटर्स, नेपाळ), माऊंट अन्नपूर्णा साऊथ फेस (८०९१ मीटर्स, नेपाळ) अशा ऊल्लेखनीय मोहीमा आहेत. त्यांना गिर्यारोहणामधले अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये २००८ मध्ये माऊंट ऎगर स्पीड क्लाइंबिंगसाठी अवॉर्ड, २०१४ मध्ये माऊंट अन्नपूर्णा साऊथ फेसची चढाई एकट्याने विक्रमी वेळेमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल गिर्यारोहणामधला मानाचा Piolet’d’ Or हा पुरस्कार त्यांना मिळाला आहेत.
गिरीप्रेमीच्या पुणे एव्हरेस्ट २०१२ आणि लोहत्से एव्हरेस्ट २०१३ या दोनही मोहिमेमधल्या गिर्यारोहकांना या महान गिर्यारोहकाशी या मोहिमांच्या दरम्यान संवाद साधता आला. त्याच्या चढाईचे कौशल्य, गिर्यारोहणाबद्दल असणारे विचार इत्यादी गोष्टी अनुभवता आल्या. यावर्षी २०१७ मध्ये एव्हरेस्ट मोहिमेसाठी गेलेल्या गिरीप्रेमीच्या उमेश झिरपे यांच्याशी त्यांनी गिर्यारोहण आणि त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन, माऊंट एव्हरेस्टच्या चढाई मधली आव्हाने इत्यादी बद्दल चर्चा केली होती. ज्येष्ठ गिर्यारोहक सर ख्रिस बोनिन्गटन यांनी ऊली स्टेकला श्रद्धांजली देताना “आजपर्यंतच्या गिर्यारोहकांमधला महान आणि सर्वोत्तम गिर्यारोहक” असे उद्गार काढले आहेत. PCP/DJ 09 30
