Pune Crime

PUNE MOUNTAINEER AND ARCHITECT LOSSES LIFE DURING EXPEDITION AT MOUNT NOON.

पुणे ३१ जुलै २०१७ (पीसीपी न्यूज) : पुण्यातील गिर्यारोहकाचे ‘माउंट नून’ मोहिमेदरम्यान दुर्दैवी निधन

पुण्यातील प्रसिद्ध आर्किटेक्ट सुभाष टकले यांचे ‘माउंट नून’ मोहिमेदरम्यान ‘कॅम्प ३’ येथे अतिउंचीवर होणाऱ्या त्रासामुळे दुर्दैवी निधन झाले. दिल्लीस्थित ‘अल्पाईन वांडरर्स’ या गिर्यारोहण संस्थेकडून पुण्यातील सुभाष टकले व जितेंद्र गवारे, दिल्लीतील नितीन पांडे व जम्मू काश्मीर येथील गुलजार अहमद हे कारगिल भागातील ‘माउंट नून’ या ७१३५ मीटर उंच असणाऱ्या शिखरावर मोहिमेसाठी जुलै महिन्याच्या मध्यास रवाना झाले होते.

शनिवारी ‘माउंट नून’च्या शिखरमाथ्याच्या शेवटच्या चढाईच्या वेळी अतिउंचीमुळे दम लागून शरीरातील त्राण गेल्यामुळे सुभाष टकले यांचा मृत्यू झाला.
२८ जुलै रोजी सुभाष टकले, जितेंद्र गवारे, नितीन पांडे व गुलजार अहमद यांनी आपल्या ४ शेर्पा साथीदारांच्या सोबत ‘माउंट नून’च्या शिखर चढाईसाठी सुरवात केली. सर्व जण जेव्हा जवळपास ७ हजार मीटर उंचीवर पोहचले तेव्हा सुभाष टकले यांना अतीउंचीमुळे खूप थकवा आला होता व त्यांना पुढे चढाई करणे अवघड जात होते. त्यावेळी टकले यांना तेथेच विश्रांतीसाठी थांबविले व इतर गिर्यारोहकांनी शिखरावर आगेकूच केली. शिखराहून परत येईपर्यंत टकले यांची प्रकृती आणखी खालावली.

त्यावेळी सर्वांनी निर्णय घेऊन टकले यांना लवकरात लवकर कॅम्प ३ वर पोहचवून पुढे हेलीकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचे ठरवले. त्यानुसार उर्वरीत गिर्यारोहकांनी टकले यांना कॅम्प ३ ला आणले व त्यांच्या जवळ अन्न व पाण्याची सोय करून जितेंद्र गवारे ताबडतोब मदतीसाठी ‘बेस कॅम्प’कडे परतला. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ‘बेस कॅम्प’ला पोहोचताच त्याने मदतीसाठी पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेशी संपर्क साधला तसेच जवळच असलेल्या पानिखेर येथील भारतीय सैन्य दलाच्या तळावर जाऊन मदतीसाठी विनंती केली. तोपर्यंत ‘गिरिप्रेमी’ने रेस्क्यू ऑपरेशनची सूत्रे हातात घेऊन एक पथक लेहला पाठविले. यात गिर्यारोहक डॉ. सुमित मांदळे व टकले यांचे सहकारी संदीप बंब यांचा समावेश होता.

तसेच ‘गिरिप्रेमी’चा आणखी एक गिर्यारोहक दिनेश कोतकर हा दुसऱ्या मोहिमेसाठी लेहलाच असल्याने त्याची देखील या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत झाली. या तिघांनी मिळून ‘गिरिप्रेमी’ची लेहमधील एजन्सी ‘व्हाईट मॅजिक अॅडव्हेंचर्स’च्या दहा शेर्पा साथीदारांच्या मदतीने बेस कॅम्पवर रेस्क्यूसाठी मदत केली. या हेलीरेस्क्यूसाठी केंद्रीय मंत्री माननीय प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने मदत करून भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. कारगिल व लेह येथील भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या ऑपरेशनमध्ये सहकार्य केले. दुर्दैवाने हेलीकॉप्टर रेस्क्यू टीम ‘कॅम्प ३’ वर पोहचेपर्यंत सुभाष टकले यांचा मृत्यू झाला होता. श्री. सुभाष टकले हे गिरिप्रेमीशी संलग्न होते व त्यांच्या अकाली निधनामुळे गिरिप्रेमी परिवारावर देखील मोठ आघात झाला आहे. पीसीपी/डीजे १७ ३०

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top