सोशल डिस्टनसिंगचा नियम पळत ‘हॉटेल वैशाली’चे मालक जगन्नाथ शेट्टी यांच्याकडून 1 कोटीच्या मदतीचा धनादेश स्वीकारताना प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख.
पीसीपी न्यूज पुणे (सुमु) ०६ एप्रिल २०२० : मुख्यमंत्री सहाय्यता निधीला राज्यातील नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केल्यानंतर व त्याबाबतचा सातत्याने पाठपुरावा त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांनी केल्यानंतर शहरातील वैशाली उपहारगृहाचे जगनाथ शेट्टी यांच्या जगनाथ शेट्टी फौंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोशात तब्बल एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली.
प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन एक कोटीचा मदतीचा धनादेश स्वीकारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सोशल डीस्टन्स ठेवून मदत स्वीकारन्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची पुरेपूर अंमलबजावणी करून देशमुख यांनी धनादेश स्वीकारतानाही सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळला. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले,”जगन्नाथ शेट्टी फौंडेशनने केलेली मदत प्रशासनाचे मनोबल वाढविणारी आहे. समाजातून मदतीचा ओघ वाढला तर आमचे बळ वाढेल. पुणे जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे. कोरोनाच्या सरकारच्या लढाईला बळ द्यावे.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ आणि प्रशासन महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी ज्यांना जे शक्य आहे ती मदत करण्याचे आवाहन केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांनी याबाबतचा सातत्याने पाठपुरावा केला. पीसीपी/डीजे/०९३०
