बारामती दि. 26: ‘कोराना’चा प्रसार रोखण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून राज्यासह देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदीचा परिणाम इतर गंभीर आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांवर होवू नये यासाठी ‘रुग्ण सहायता कक्षा’शी संपर्क साधण्याचे अवाहन कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ आणि मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीत ‘रुग्ण सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या टाळेबंदीच्या कठीण काळात गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना या ‘रुग्ण सहायता कक्षा’चा मोठा उपयोग होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांच्या गंभीर आजारांवर उपचार केले जातात. मात्र या योजनांची माहिती, तसेच यासाठी कोणाकडे पाठपुरावा करायचा? ही माहिती तसेच त्यासाठीचा वेळही रुग्णांच्या नातेवाईकांच्याकडे नसतो. त्यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णांना शासनाच्या योजनांची एकत्रित माहिती मिळावी आणि रुग्णांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेत ‘रुग्ण सहाय्यता कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर दि. 26 जानेवारी 2020 रोजी जिल्हा परिषदेच्या इमारतीत या कक्षाची स्थापना करुन कामाची सुरुवात करण्यात आली.
